जुन्नर (रफिक शेख) : नगरपरिषद निवडणुकीच्या प्रचाराचा शेवटच्या दिवशी उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची जुन्नर मध्ये सभा पार पडली. या प्रचार सभेत एकनाथ शिंदे यांनी नागरिकांना आवाहन करताना सांगितले की, “नगरपरिषद एकहाती सत्ता द्या, नगरविकास खातं माझ्याकडे आहे. जुन्नरचा कायापलट केल्या शिवाय मी राहणार नाही. आपण जी कामे द्याल त्याला एक रुपया कमी पडू देणार नाही, असेही आश्वासन त्यांनी दिले.
जुन्नर शहराच्या विकासासाठी आवश्यक असलेल्या प्रकल्पांना गती देण्यासाठी आपण कटिबद्ध असल्याचे सांगत शिंदे म्हणाले की, जुन्नर शहरातील पायाभूत सुविधा, रस्ते, पाणीपुरवठा, स्वच्छता उपक्रम आणि सार्वजनिक सोयीसाठी आवश्यक निधी उपलब्ध करून देण्याचे आश्वासन त्यांनी दिले. या सभेत आमदार शरद दादा सोनवणे यांचे एकनाथ शिंदे यांनी विशेष कौतुक केले.
मंचावर नगराध्यक्ष पदाच्या उमेदवार सुजाता मधुकर काजळे, तसेच नगरसेवक पदाचे उमेदवार, शिवसेना (शिंदे गट) पदाधिकारी आणि मोठ्या संख्येने नागरिक उपस्थित होते. प्रचाराच्या अखेरच्या दिवशी शिंदे यांनी घेतलेला हा दौरा आणि सभा यामुळे निवडणुकीची रंगत अधिकच वाढली असून आता सर्वांची नजर मतदानाच्या दिवशी नागरिक कोणावर विश्वास ठेवतात याकडे लागली आहे.
